अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहरात शुक्रवारी डॉ. विजय वर्मा या नामांकित डॉक्टरवर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पिता-पुत्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टरच्या दोन्ही पायांना जबर मार लागला असून पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.
परतवाडा येथील पट्टलवर लाइन परिसरात डॉ. विजय वर्मा यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दादाराव आखरे आणि त्यांचा मुलगा राहुल आखरे यांनी घराबाहेर पडलेल्या डॉ. विजय वर्मा यांना मारहाण केली. यावेळी दादाराव आखरे याने डॉ. वर्मा यांच्या डोक्यावर काठी मारली तर राहुलने लोखंडी रॉडने डॉ. वर्मा यांच्या दोन्ही पायांवर केलेत. यावेळी डॉ. वर्मा यांच्या पत्नी आणि मुलाने हल्लेखोरांच्या तावडीतून वर्मांना सोडविले. गंभीर जखमी असणाऱ्या डॉ. वर्मा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, डॉ. वर्मा आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आखरे कुटुंबात बऱ्याच वर्षांपासून वाद आहे. मध्यंतरी आखरे पिता-पुत्रांनी डॉ. वर्मा यांच्या पत्नीलाही मारहाण केली होती. आता डॉ. विजय वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे.