अमरावती - कोरोनासाठी दक्षता म्हणून व गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे शेतकरी गटांमार्फत वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तिवसा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ वरखेड येथे पार पडला.
शेंदूरजना बाजार, वणी, ममदापूर, वरखेड, तारखेड या गावांसाठी खते, बियाणे घेऊन जाणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपक्रमाचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही कृषी निविष्ठा पोहोचवणार असल्याचे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. कोरोनामुळे सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. पावसाळा सुरू होत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून काही उपाययोजना राबवण्यात येत आहेत.