अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रसंगी दंडात्मक कारवाईसुद्धा केली जात आहे. तरीही काही नागरिक कोरोनाचे नियम न पाळता बिनधास्त वावरत असल्याने त्यांच्या विरोधात धामणगाव रेल्वे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कारवाई करणे सुरू केले आहे. धामणगाव रेल्वे दत्तापूर पोलीस आणि नगर परिषदेच्या वतीने शनिवार २० फेब्रुवारी दुपारच्या सुमारास मुख्य चौकातून तोंड न बांधता फिरणाऱ्या नागरिकांवर दंड वसूल करण्यात आला. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत.
नागरिकांनी तोंडाला मुखपट्या अथवा रुमाल बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचित करीत आहे. तरीही धामणगाव रेल्वे शहरातील बरेच नागरिक नियम पाळत नाहीत. त्यामुळे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी आज धामणगाव शहरात दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी नगरपरिषदेचे अधिकारी जयराम पांडे, युनूस खान, अविनाश डगवार, सचिन कटरमाल, सईद खांसह दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.