अमरावती - संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेंडगावबरोबरच त्यांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव येथेही संयुक्त आराखड्यातून विकासकामे पूर्ण केले जातील. याकरिता निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज शेंडगाव येथे दिली. संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या.
10 महिन्यात पूर्ण होणार कामे -
विकास आराखड्यात १८.६३ कोटी निधीतून धर्मशाळा बांधकाम, संत गाडगेबाबा स्मृती भवन, बहुउद्देशीय सभागृह, न्याहारी भवन, आर्ट गॅलरी, ग्राम सफाई अभियान प्रशिक्षण केंद्र, विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, घाटाचे बांधकाम, प्रसाधनगृह आदी कामे ही १० महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
गाडगेबाबा मिशनचे सदस्य होणे हा बहुमान -
विकास आराखड्यात नियोजित कामांसह इतरही आवश्यक कामांचा समावेश केला जाईल. संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमी असलेल्या सर्व गावांचा संयुक्त आराखड्यातून विकास करण्यात येईल. याकरिता निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. संत गाडगेबाबा यांनी मानवतावादाची शिकवण दिली व अंधश्रद्धा नाकारल्या. ते थोर कर्मयोगी होते. त्यामुळे आपणही बाबांची खरी शिकवण अंगिकारली पाहिजे व पूजा अर्चा आदी टाळून कृतीवर भर दिला पाहिजे. तसेच संत गाडगेबाबा मिशनमध्ये सदस्यपद मिळणे, हा आपल्यासाठी सर्वोच्च बहुमान असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'महागाईमुळे जनता त्रस्त तर मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त'