अमरावती- राज्यातील मजूर, गरीब, शेतकरी यांना सुखी समृद्धी कर त्यांच्या आयुष्यात भरभराटी येवो, असे साकडे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विठुरायाकडे घातले आहे. अमरावतीच्या कौडण्यपूर येथून माता रुक्मिणीच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी त्या ईटीव्ही भारतशी बोलत होत्या.
रुक्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जात असते. याला ४२५ वर्षांची परंपरा आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोजक्याच पालख्यांना परवानगी मिळाली. सुरुवातीला विदर्भातील महत्वाची पालखी असलेली माता रुक्मिणीच्या पालखीला परवानगी मिळाली नव्हती. हा मुद्दा मी कॅबिनेटमध्ये लावून धरला होता. त्यानंतर पालखीला परवानगी मिळाली, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. दरम्यान, पालखीसोबत जाणाऱ्या २० वारकऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौडण्यपूरमध्ये भाविकांनी गर्दी न करता घरुनच माता रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे आवाहन कौडण्यपूर मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.