अमरावती - संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्या प्रकरणात अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जमीन शनिवारी अचलपूर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
रेड्डीच्या वकिलाने केला होता असा अर्ज
दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात भादंवीच्या कलम 306 अंतर्गत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीनिवास रेड्डी यांचा या गुन्ह्याशी काही एक संबंध नाही. तक्रारीत सुद्धा रेड्डी यांचे नाव नाही. असे असताना रेंजर्स असोसिएशन रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहे. तसेच राजकीय मंडळींचं दबाव टाकून रेड्डी यांच्याविराधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी प्रेशर निर्माण केले जात आहे. असे रेड्डी यांचे वकील एस. के. मुंगीलवर यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. एफआयआरमध्ये नाव नसताना विनाकारण रेड्डी यांचे नाव या प्रकरणाशी जोडणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, असेही वकील एस.के. मुंगीलवार यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
न्यायालयाचा निर्णय
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित सर्व बाजू पडताळून न्यायालयाने श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
हेही वाचा - निवेदन दिले, गाठीभेटी घेतल्या, पैसेही फेकले तरी दीपालीची बदली नाही-भावनिक पतीचा आरोप
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला आयपीएसकडे