अमरावती - भानखेडा येथील वनक्षेत्रात आढळलेल्या मृत कोंबड्याचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यू बर्डफ्लूमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षता म्हणून कुक्कूटपालन करण्याऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या असून कोबंड्यांची नियमित तपासणी होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह -
भानखेडा येथील वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तीने मृत 50 कोंबड्या आणून टाकल्या होत्या. वनविभागाने पंचनामे करून या कोंबड्या खोल खड्ड्यात पुरल्या व तपासणीसाठी त्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या टीमने जाऊन परिसराची पाहणी केली. तसेच हे क्षेत्र 10 किमीपर्यंत इन्फेक्शन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित -
चिकन-अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. शरीराला प्रथिनांची गरज असते. संसर्गाशी लढण्याची ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे कोरोनाकाळात तर अशा प्रथिनेयुक्त अन्नाची गरज आहे. या सर्वोत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नाबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नयेत. पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे, असे आवाहनही यावेळी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले.