अमरावती - कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवांकरिता बाहेर पडता येते असले तरी त्यातही अटी लादल्या आहेत. नागरिकांनी किमान सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. परंतु, अमरावती तालुक्यातील वलगाव येथील भारतीय स्टेट बँकेसमोर आज पैसे काढण्यासाठी शेकडो लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. यामुळे सुरक्षित अंतराचे तीन तेरा वाजले.
अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली आहेच, शिवाय नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. परंतु, या सर्वांना फाटा देत वलगाव येथील स्टेट बँकेसमोर आज (बुधवार) अंदाजे तीनशेपेक्षा जास्त नागरिकांची विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच वलगाव पोलीस ठाण्याला सुरक्षा लावण्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांचा देखील बंदोबस्त लावला असता तरी सुद्धा नागरिक पोलिसांनाही जुमानत नसल्याचे समोर आले आहे.