अमरावती - अंजनगावमध्ये बाजार समितीने व्यवस्थित अंतर ठेवून दिलेल्या जागेत भाजीपाल्याची दुकाने न लावता जवळजवळ लावली जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील नगरपालिका प्रशासनाने भाजीपाला अडत मधील गर्दी टाळण्यासाठी ३१ मार्चपासून ठोक भाजीपाला बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित केला होता. मात्र, अडते लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल स्वत: विकला. या परिसरामध्ये धोकादायक अशी गर्दी पाहायला मिळाली.
३१ मार्चपासून ठोक भाजीपाला विक्रेत्यांना कृषी ऊत्पन्न बाजार समितीत आसलेल्या जागेवर बसण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, आडत्यांनी बाजार समितीत येण्यास टाळल्याने शेतकरी आणि काही छोट्या विक्रेत्यांना समितीने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विशिष्ट अंतर ठेवून, दुकान लावण्याकरिता आखणी केली होती. मात्र, भाजीपाला विक्रेत्यांनी बेशिस्तीने दुकाने एकमेकांच्या जवळजवळ लावली. त्यामुळे गर्दी झाली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत काल पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून मदत सुध्दा मांगितल्याचे सचिव गजानन नवघरे यांनी सांगितले. मात्र, आज एकही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता, त्यामुळे बाजार समिती व नगरपालिका कर्मचार्यांची तारांबळ उडाली होती. तसेच अंजनगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा. कमलकांत लाडोळे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी येथील ठोक भाजीपाला बाजारासोबत इतर विक्रेत्यांना सुध्दा बाजार समितीच्या प्रशस्त आवारात जागा उपलब्ध करून दिली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने सुध्दा ती उपलब्ध करून दिली होती.