अमरावती - मेळघाटातील हरिसाल येथे स्टेट बँक ऑफ इंडियासमोर पैसे काढण्यासाठी शेकडो आदिवासी बांधवांची गर्दी उसळली होती. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजारही बंद असून हाताला काम नाही. अशात सरकारने देशातील गरिबांसह मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 500 रुपये आणि उज्वला योजनेंतर्गत 750 रुपये जमा केले आहेत.
खात्यात सरकारने जमा केलेली रक्कम काढण्यासाठी मेळघाटातील हरिसाल येथील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर सोमवारी चांगलीच गर्दी झाली. हरिसालसह लगतच्या गावातील रहिवाशांचे खातेही या बँकेत असल्याने अनेक गावातील खातेदारांनी बँकेसमोर गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही. मात्र, अनेकांनी तोंडाला रुमाल आणि कापड बांधले होते.