अमरावती : मान्सून पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले विविध आदिवासी नृत्य हे उद्घाटन सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. स्थानिक आदिवासी बांधवांनी ढोलकीच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन त्यांच्या नृत्यद्वारे सादर केले. यावेळी सिपना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मेळघाटातील पर्यटनाचे महत्त्व विशद केले.
वालुकाशिल्पही ठरले आकर्षण : आतापर्यंत वालुका शिल्प हे समुद्राच्या किनाऱ्यावरच पाहायला मिळायचे. आयोजित मान्सून पर्यटन महोत्सवात पहिल्यांदाच सातपुडाच्या उंच शिखरावर नागपूर येथील वाळू शिल्प कलावंत विनायक निटूरकर यांनी गाविलगड किल्ला, चंद्रयान तीन उड्डाण तसेच वनविभागाचे चित्रण रेखाटले.
रानभाज्यांनी पर्यटकांना आकर्षिले : मान्सून पर्यटन महोत्सवात सिपना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या रानभाज्यांच्या स्टॉलने पर्यटकांना खास आकर्षित केले. कर्करोगासह अनेक आजारांवर उपयुक्त असणाऱ्या रानवांग, पानफुटी, मीठ निम, सीता लक्ष्मण, तुळस भुई, आवळा अशा विविध भाज्यांची माहिती या महोत्सवानिमित्त पर्यटकांना खास उपलब्ध करून देण्यात आली.
पर्यटकांनी लुटला जंगल सफारीचा आनंद : मान्सून पर्यटनानिमित्त पर्यटकांसाठी खास जिप्सीद्वारे जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले. चिखलदरा येथील हरीकेन पॉइंट मोझरी पॉइंट, भीमकुंड, पंचबोल देवी पॉईंट, कीचक दरी, गाविलगड किल्ला अशी विविध ठिकाणेही जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना दाखवण्यात आली.
वाइल्ड कॉलवर टाळ्यांचा गडगडाट : ताडोबा येथील पक्षी अभ्यासक सुमध वाघमारे यांनी मोर, कोकिळा, कावळा, चिमण्या अशा विविध पक्षांचा हुबेहूब आवाज काढून टाळ्यांचा गडकडाट मिळवला. प्राणी आणि पक्षांवर प्रेम करा, असा संदेश देखील त्यांनी यावेळी पर्यटकांना दिला.
मेळघाटात पर्यटकांची तुफान गर्दी : जून ते सप्टेंबर हे चार महिने मेळघाटातील चिखलदरा परिसर अतिशय सुंदर भासत असल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. मेळघाटात वाहणाऱ्या गडगा आणि सिपना नदीच्या काठावर पर्यटकांनी फोटो काढण्याचा मनमुराद आनंद लुटला. आगामी पर्यटन महोत्सवाला प्रेक्षकांची यापेक्षाही तुफान गर्दी उसळण्याची शक्यता आहे. यावेळेस झालेली तुफान गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.