अमरावती - तरुबांदा वनपरिक्षेत्र कार्यालयात प्रवेश करताच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीन लाकडी खांबांवर पृष्ठाचे छोटेसे खोके लटकावले दिसतात. या खोक्यांवर जिओ, आयडिया आणि बीएसएनएल असे लिहून ठेवण्यात आले आहे. हे पाहून नवख्या व्यक्तीला आश्चर्य झाल्याशिवाय आणि या प्रकाराविषयी कुतूहल झाल्याशिवाय राहणार नाही. 'ईटीव्ही भारत'ने याबाबत चौकशी केली असता, खोक्यांवर लिहिलेल्या दूरसंचार कंपनीच्या नावाप्रमाणे, संबंधित खोक्यात मोबाईल फोन ठेवेल्यास संबंधित कंपनीचे नेटवर्क मिळते. यामाध्यमातून या घनदाट जंगलातही आपल्याला जगभरात कुठेही संवाद साधाता येतो, अशी माहिती आकाश गोडकर या कर्मचाऱ्याने दिली आहे.
मेळघाटात मोबाईल नेटवर्क मिळणे फार दुर्लभ आहे. चिखलदरा आणि धारणी येथे काही प्रमाणात नेटवर्क मिळते. धारणी क्षेत्रालगतच्या मध्य प्रदेशातून नेटवर्क मिळते, तर काही दूरसंचार कंपन्या धारणी आणि लगतच्या भागात आता टॉवर उभारत आहेत. असे असले तरी परतवाडा शहर सोडून मेळघाटात प्रवेश करताच मोबाईल फोन निकामी होतात. दूर दूर पर्यंत मोबाईल फोनला नेटवर्क मिळत नाही. तारुबांदा हे गाव तर जंगलाच्या कोअर क्षेत्रात आहे. या ठिकाणी मोबाईल फोन लागणे ही कल्पना करणेही अशक्य. मात्र, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या खांबावर एकाच ठिकाणी मोबाईल रेंज येणे आणि तिचा शोध लावणे हे खरोखर दिव्यच कार्य. याच जुगाड टेक्नॉलॉजीद्वारे एक नव्हे तर तीन कंपन्यांच्या मोबाईलचे नेटवर्क शोधण्यात तारूबांदा वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी आकाश गोडकर यांना यश मिळाले आहे.
हेही वाचा - 'अरे कशाला दाऊद.. दाऊद करत बसलात'
'ईटीव्ही भारत'शी बोलताना गोडकर यांनी सांगितले. 'मी मूळचा धारणीचा रहिवासी आहे. आमच्या धारणी क्षेत्रात मोबाईलची रेंज मिळते. मात्र, नोकरीनिमित्त मी तरुबांदा येथे आलो. याठिकाणी मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने फोन निकामी होतात. मात्र, धारणीत नेटवर्क मिळवण्यासाठी केलेल्या प्रयोगांप्रमाणे काही प्रयोग येथे आम्ही करून पाहिले. रिकाम्या वेळात गावाच्या परिसरात मोबाईल फोन घेऊन नेटवर्क मिळवण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, एकदा ऑफिसच्या खांबाजावळ नेटवर्क मिळत असल्याचं लक्षात आलं. त्याच खांबावर विविध ठिकाणी मोबाईल पकडून पाहिल्यावर एका विशिष्ठ ठिकाणी चांगले नेटवर्क मिळते हे लक्षात आले. मग जिथे मोबाईल फोन कनेक्ट होतो, तिथे पुठ्ठ्याचा खोका लावला. याच ठिकाणी मोबाईल फोन ठेऊन नंबर डायल केला आणि स्पीकर ऑन करून संवाद साधला. अशाच प्रकारे आणखीही काही खांबांवर हा प्रयोग करून इतर दूरसंचार कंपण्यांच्या नेटवर्कचा शोध लावला. आता कार्यालयातील सर्व कर्मचारी या ठिकाणी येऊन दूरवर असणाऱ्या आपल्या कुटुंबाशी संवाद साधतात. अनेकदा आदिवासी ग्रामस्थही याचा लाभ घेत असतात.' असे गोडकर यांनी सांगितले.
हेही वाचा - सुनिल केदार त्यांच्या मागणीवर ठाम; तर यशोमती ठाकूर यांची राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी