अमरावती - कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा शहरात शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रमधील विद्यार्थी अडकले. तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राजस्थान सरकारशी बोलणी केली. आज त्या विद्यार्थ्यांना राजस्थानमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्रात आणण्यात आले. अमरावती विभागातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेस महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाले. तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
उच्च शिक्षणासाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थी, राजस्थानमधील कोटा शहरात जातात. यावर्षी देखील अमरावती विभागातील 200 हून अधिक तर अमरावती जिल्ह्यातील 72 विद्यार्थी हे कोटा येथे शिक्षणासाठी गेले होते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर केला आणि वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे ते विद्यार्थी कोटा शहरात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांचे पालकांनी त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा आम्हाला घरी परत न्या, अशी विनवणी सरकारकडे केली होती. यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी राजस्थान सरकारशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा केला. तर अमरावती जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा - 'कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकांविरूद्ध गुन्हा दाखल करा'
हेही वाचा - धक्कादायक: आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू