अमरावती- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शनिवारी शतक पूर्ण केले. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 103 वर गेली आहे. शनिवारी एकूण 9 नवे कोरोनाबाधित समोर आले असून त्यात पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरचा समावेश असल्याने खळबळ माजली आहे.
अमरावतीत शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 9 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यास कोरोना झाल्याचे समोर येताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. 28 वर्षीय डॉक्टरलाही कोरोना असल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरचा दवाखाना अमरावती शहरामध्ये आहे. हा दवाखाना चार दिवसांपूर्वीच बंद झाल्याची माहिती आहे. तसेच इतर सात जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला आढळला होता. 28 एप्रिलला कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली होती. 2 मे (50) , 7 मे (75) आणि शनिवारी 100 चा आकडा पार करुन कोरोना रुग्णांची संख्या 103 झाली आहे.