अमरावती : तब्बल वर्षभरानंतर अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढायला लागली असल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात सध्या घडीला एकूण 15 कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, लोकांनी याबद्दल काहीही घाबरण्याचे कारण नाही. पुर्वीसारखी परिस्थिती नाही असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच, ज्या ठिकाणी कोरोनाची काही लक्षण आढळतील त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला कळवावे असेही विभागाने कळवले आहे.
असे वाढत आहेत कोरोना रुग्ण : अमरावती शहरात आणि ग्रामीण भागात तीन मार्चला प्रत्येकी एक असे दोन रुग्ण तब्बल आठ महिन्यानंतर आढळून आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चार मार्चला अमरावती शहरात गोपाल नगर परिसरात दोन पुरुष आणि एक महिला असे तिघेजण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता 13 वर पोहोचली, तर ग्रामीण भागात दोन जण कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी अमरावती शहरातील महादेव नगर परिसरात 55 वर्ष महिला तसेच जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या धामख्या गावात 65 वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे आढळून आले आहेत.
आरोग्य यंत्रणा सज्ज : आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना घाबरू नये असे आवाहन करण्यात आले असून, खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी पोहोचत असून, शाळा प्रशासनाला कोरोना पसरणार नाही याबाबत योग्य त्या सूचना देखील देत आहेत. सध्या जिल्ह्यात खोकला आणि तापेचे रुग्ण वाढले आहेत. या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर ते कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून यायला लागल्यामुळे समाजात काहीशी भीती निर्माण झाली असून, आता पूर्वीप्रमाणे भिण्याचे कारण नाही असे देखील आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.