अमरावती - देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्यांनी आपल्या गावच्या रस्त्याची वाट पकडली आहे. परंतु या संचारबंदीमुळे सर्व वाहतूक सेवा ठप्प आहे. यामुळे हजारो मजुर शेकडो किलोमीटर पायी चालत आपले गाव गाठत आहेत तर अनेक जण ट्रक, कंटेनरमधूनही प्रवास करत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला असून सुमारे 97 कारागिरांना घेऊन राजस्थानला जाणारा एक कंटेनर मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिसांनी पकडला आहे.
राजस्थानवरून मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचरचे काम करणारे कारागीर हे महाराष्ट्रात सतत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने, या कारागीर अन त्यांच्या कुटुंबीयांची उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आपले गाव जवळ करण्याचा निर्णय या मजुरांनी घेतला. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील 97 मजूर या कंटेनरमध्ये होते. दरम्यान, मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना हा कंटेनर आढळून आल्याने त्यांनी कंटेनर (आर जे 19 जीएफ 4502) अडवत चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
या कंटेनरमध्ये 3 महिला व चार लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. सदर वाहनातील सर्व लोकांना कोरोना तपासणीसाठी मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करुन त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कंटेनर चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'दिवाळीत जसा किराणा माल वाटता, तसा आज आम्हाला हवा आहे'