अमरावती - काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते तथा धामणगाव रेल्वे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील सिसोदे यांनी आमदार विरेंद्र जगताप यांच्या विरोधातच बंड पुकारले आहे. आमदार जगतापांच्या चांदूर रेल्वे येथील घरासमोर त्यांनी मंगळवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव आणि वरुड बगाजी येथील प्रसुती झालेल्या एका महिला रुग्णास वैद्यकीय अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केली होती. या प्रकरणी तो मगरूर वैद्यकीय अधिकारी चौकशी अहवालानुसार दोषी आढळून सुध्दा कारवाई झाली नाही. त्यामुळे सिसोदे यांनी या घटनेचा निषेध करत हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या असता, चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई न करता थातूरमातूर कारवाई करून पदाधिकारी आणि अधिकारी यांनी दोषींना सहकार्य केल्याचा आरोप सुनील सिसोदे यांनी केला. त्यामुळे यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर येथे असाच प्रकार चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा दाखल झाल्या आहेत. याशिवाय २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात वरुड बागाजी येथील एका प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेस सुद्धा शिवीगाळ केल्याचे सिसोदे यांनी सांगितले. सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर दोन वर्षापासून कोणतीही कारवाई न झाली नाही. मात्र, या प्रकरणी आमदार विरेंद्र जगताप यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली नाही, किंवा विधानसभेत सुद्धा प्रश्न उचलला नसल्याचा आरोप सिसोदे यांनी केला आहे. त्यामुळेच आता मी आमरण उपोषणाला बसलो असल्याचे सुनील सिसोदे यांनी सांगितले. आपल्याच नेत्याविरोधात कार्यकर्ता उपोषणाला बसल्यामुळे अनेकांनी उपोषणस्थळी गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.