अमरावती - शहरात शुक्रवारी रात्री वलगाव मार्गावर एका अल्पवयीन मुलाने अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार करणार्या तरुणाला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे.
तोफिक खान असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन आरोपी, जखमी आणि इतर काही तरुण वलगाव मार्गावर सोबत बसले होते. त्यावेळी आरोपीने अचानक त्याच्याजवळ असणाऱ्या पिस्तूलमधून गोळीबार सुरू केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एक गोळी तोफिक खानच्या गुडघ्याला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार समजताच जमावाने अल्पवयीन आरोपीला पकडून ठेवले व तोफिक खान याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाने पकडून ठेवलेल्या आरोपीला अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपी हा मसानगंज या परिसरातील रहिवासी असून हा संपूर्ण परिसर कोरोना हॉटस्पॉट आहे. या परिसरात शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले असून या परिसरातील व्यक्तींना सहजासहजी परिसराबाहेर जाता येत नाही. तरीही हा अल्पवयीन मुलगा पिस्तूल घेऊन वलगाव मार्गावर कसा पोहोचला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.