अमरावती - खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफ न झाल्याने व नवीन कर्ज न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे, तात्काळ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज द्यावे. तसेच थेट बांधावर बी बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावीत या मागण्यांसाठी आज भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे.
अमरावतीच्या वरुड तहसीलदारांना निवेदन देऊन भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी सरकार विरोधी तसेच आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान तोडगा न निघाल्यास वरुड तालुक्यातील प्रत्येक बँकेसमोर भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
सध्या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, पावसाने चार दिवसापासून दडी मारली आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाणे असल्याने ते उगवलेच नाहीत. त्यात सरकारने कर्ज दिले नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु, आमदार देवेंद्र भुयार यावर काहीच बोलत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे, जर शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, तर वरुड तालुक्यातील प्रत्येक बँकेसमोर व आमदार देवेंद्र भुयार यांच्या घरासमोरदेखील आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.