अमरावती - गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसीवर इंजेक्शनच्या घोटाळयाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच जिल्हा शल्यचिकीत्सक हेच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड आहेत, असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे. दरम्यान हे सर्व आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. अशा प्रकारचे आरोप करून प्रशासनाला बदनाम करण्यात येत आहे. समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचे काम या आरोपांमधून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया या आरोंपावर शासकीय कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. रुपेश खडसे यांनी दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यामध्ये तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ. पवन मालुसरेसोबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुदंर निकम सुध्दा सहभागी आहेत. या घोटाळ्याचे मास्टरमाईंडच ते आहेत. घोटाळ्यात त्यांचा मुलगा अमित श्यामसुदंर निकम याचा देखील सहभाग आहे. अशाप्रकारचे गंभीर आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केले आहेत.
निवेदिता चौधरी यांच्या आरोपामुळे खळबळ
भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी रेमडेसिवीर इजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकाचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मी पुराव्यानिशी आरोप केले असून, यावर डॉ. निकम यांनी बोलावे असं देखील चौधरी यांनी म्हटले आहे.
'...तर भाजपा जिल्हाध्यक्षांवर मानहानीचा दावा'
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांच्यावर खोटे आरोप लावले असून, त्यांनी याबाबत माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करू, असा इशारा डॉ. रुपेश खडसे यांनी दिला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. असे असताना देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर कोविड रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी कामबंद आंदोलन करतील असं देखील त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - रामदेव बाबा यांच्या विधानाविरोधात आयएमएकडून थेट मोदींना पत्र