अमरावती - मौजे भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे. त्यामुळे, या परिसरातील एक किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्व्हेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे, या फार्मसह परिसरातील इतर फार्मवरील 30 हजारांहून अधिक कोंबड्या उद्या (28 फेब्रुवारी) खोल खड्डा करून नष्ट करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अमरावतीमधील लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला
मौजे भानखेडा क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 57/2 मधील धिमान पोल्ट्री फार्म येथील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार अमरावती तालुका बर्ड फ्लू संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी संक्रमित क्षेत्र व सर्व्हेक्षण क्षेत्राबाबत आदेश जारी केला आहे. त्याप्रमाणे, संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्र कृती दलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत.
मृत पक्ष्यांची, तसेच पक्षीखाद्य, खाद्यघटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हेक्षण क्षेत्रातील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची केवळ त्याच क्षेत्रांतर्गत हालचाल व विक्रीस परवानगी राहील. सर्व्हेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारी चिकन उत्पादने, कुक्कुट पक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागून राहील, असे आदेशात नमूद आहे. परिसरातील सर्व फार्मवरील पक्षी खोल खड्डा करून नष्ट करण्यात येतील. त्यासाठी कृती दलांकडून कार्यवाही होत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे यांनी दिली.
हेही वाचा - अमरावती; होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉररुमची स्थापना