अमरावती : मेळघाटातील कोरकू जमातीमध्ये विविध अशा अनेक परंपरा चालीरीती रूढ आहेत. याच परंपरेनुसार बंधन विधी हा आगळावेगळा सोहळा नदी आणि नाल्यांच्या काठी आयोजित केला जातो. या विधीमध्ये गावातील भूमका किंवा भगत यांच्याद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांना नदी, नाल्याने वाहणाऱ्या पाण्यात उतरवून भूमका किंवा भगत हे त्यांना एकत्रितपणे धाग्याने सात फेऱ्यांमध्ये गुंडाळतात. यानंतर भूमका किंवा भगत हे मंत्र जाप करतात. कुटुंबातील महिलेचे लांब केस कापून ते एकत्रित गुंडाळून त्यावर मंत्रोच्चार केले जातात. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर आशीर्वाद स्वरूपात हे लांब केस गुंडाळून ठेवले जातात. हा विधी सुरू असताना काही महिलांच्या अंगात देवी येते आणि ती या कुटुंबाला आशीर्वाद देते अशी देखील मानले आहे.
कुटुंबावरील संकट टळते अशी मान्यता : या बंधन सोहळ्याच्या माध्यमातून कुटुंबावरील संकट टळते अशी मान्यता आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा एकमेकांसोबत कायम जुळून राहावा. कुटुंबातील लहान सदस्याने मोठ्यांचा आदर करावा. घरातील ज्येष्ठ मंडळी जे सांगतील तेच सर्व लहान मुलांनी ऐकावे. कुटुंबप्रमुखाच्या निर्णयाचे घरातील प्रत्येकाने स्वागत करावे. हा बंधन विधी केल्यामुळे कुटुंबात प्रेम आपुलकी टिकून राहते, अशी या विधी मागची मान्यता असल्याचे जामुननाला या गावातील रहिवासी सुरेश सावलकर यांनी सांगितले.
दुःख, पीडा गंगेला अर्पण : मेळघाटात वाहणाऱ्या नदी नाल्यांना गंगा नदी इतकेच महत्त्व आदिवासी बांधव देतात. या भागात वाहणारे पाणी हे गंगेचेच पाणी आहे असे आम्ही मानतो. या बंधन विधी सोहळ्याच्या निमित्ताने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे दुःख, पीडा साऱ्या काही अडचणी समस्या या गंगेत वाहून जातात. गंगेला त्या अर्पण होतात असे आमच्या पूर्वजांपासून सांगण्यात येत असल्याचे देखील सुरेश सावलकर म्हणाले.
बकऱ्याचा दिला जातो बळी : बंधन विधी सोहळ्यानिमित्त देवाला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो. ऐपतीप्रमाणे एखादे कुटुंब केवळ आपल्या नातेवाईकांना किंवा संपूर्ण गावाला या सोहळ्यासाठी आमंत्रित करतात. सुमारे दोन अडीच तासापर्यंत बंधन सोहळ्याचा विधी चालतो. या सोहळ्याच्या निमित्ताने बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. विधी आटोपल्यावर प्रसाद म्हणून सोहळ्यात सहभागी प्रत्येकाला मटणाची मेजवानी दिली जाते. या सोहळ्यासाठी एका कुटुंबाला सुमारे 25 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. आपल्या सोयीप्रमाणेच हा विधी केला जातो.
सर्वच भागात अशी प्रथा नाही : कोरकू जमातीमध्ये आखाडी हा सण झाल्यावर जीवती निमित्त अनेक कुटुंबात बंधन सोहळा हा विधी आयोजित केला जातो. मेळघाटात चिखलदरा तालुक्यातच दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये बंधन सोहळा हा अतिशय थाटात साजरा केला जात असला तरी चुरणी, काटकुंभ अशा उंच भागावरील गावांमध्ये हा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने केला जातो अशी माहिती, जैतादेही येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असणारे गणेश जामूनकर यांनी दिली.
हेही वाचा -
- Melghat Waterfall : पांढऱ्या शुभ्र पाण्यासह मेळघाटातील धबधबे मोहरले; पर्यटकांची उसळली गर्दी
- Muratkar Work On Pastures : तृणभक्षकापासून चित्ते आणि वाघांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यास प्रा. डॉ. गजानन मुरतकर यांची महत्त्वाची भूमिका
- Sand Sculpture In Amravati: समुद्राकाठची कला थेट सातपुड्याच्या टोकावर; 'मान्सून पर्यटन' महोत्सवात..खास वाळूशिल्पाची पर्वणी