अमरावती - सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा नेता म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांची ओळख आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीचे काम न झाल्यास अधिकाऱ्यांवर हात उगारणारे बच्चू कडूही लोकांनी पाहले आहेत. काल त्यांचे एक वेगळे रूप शेतकऱ्याच्या दोन चिमुकल्यांना अनुभवायला मिळाले. शेतकरी बापाला मदत म्हणून रस्त्यालगत मुगाच्या शेंगा विकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर बच्चू कडू यांची नजर पडली. त्यांनी वाहन थांबवून त्या मुलांकडून संपूर्ण शेंगा खरेदी केल्या व त्यांचे व्यवहारीक ज्ञान पाहून त्या मुलांना बक्षीसही दिले.
राज्यमंत्री बच्चू कडू अमरावतीवरून मतदार संघाच्या दौऱ्यासाठी निघाले होते. कठोरा मार्गे चांदूरबाजारला येत असताना गोपाळपूर ते पुसदा गावादरम्यान दोन लहान मुले मुगाच्या शेंगा विकत असल्याचे त्यांना दिसले. राज्यमंत्र्यांनी तत्काळ आपले वाहन थांबवले आणि शेंगा विकणाऱ्या मुलांजवळ आले. त्यांनी मुलांना शेंगांचा भाव विचारून, सर्व शेंगा मोजून देण्यास सांगितल्या.
शेंगा मोजणी होईपर्यंत त्यांनी दोन्ही मुलांच्या शाळा व अभ्यासाबाबत माहिती घेतली. यावेळी ही दोन्ही मुले शाळा बंद असल्याने वडिलांना शेंगा विकण्यासाठी हातभार लावत असल्याचे कळले. या वयात शेतकरी वडिलांप्रती मुलांची जबाबदारी पाहून राज्यमंत्री कडूंना समाधान वाटले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी शेंगांच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम बक्षिस म्हणून दिली.
मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून केली शेंगा खरेदी -
सध्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या या लहान मुलांनी, आपल्या वडिलांनी शेतात पिकवलेला माल रस्त्याच्या कडेला बसून विकणे हे, या मुलांच्या शेती व्यवसायातील प्रगतीचे द्योतक आहे. यावेळी मला त्यांच्यामधील शेती व्यसायातील उद्योजकता दिसून आली. त्यांच्यातील शेती व शेतकरी यांच्या बद्दलचा आदर कायम राहावा आणि मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मी त्यांच्या जवळील शेंगा विकत घेतल्या, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.