अमरावती - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 60 टक्के मतदान झाले असून, अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा टक्केवारी घसरल्याने निकालही धक्कादायक येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील एकूण आठ मतदार संघांपैकी अमरावती मतदारसंघात 51 टक्के तर बडनेरामध्ये 50 टक्के मतदान झाले आहे. अमरावती आणि बडनेरा या महत्त्वाच्या मतदार संघात अपेक्षेपेक्ष कमी मतदान झाल्याने निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळी ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता पाहता मतदारांनी शहरातील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली होती. 10 वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर विशेष गर्दी नव्हती. दुपारी तीन नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा असताना अनेक मतदान केंद्रवर शांतता होती.
अमरावती आणि बडनेरा शहराच्या तुलनेत मेळघाटात 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला आहे. धामणगाव रेल्वे , तिवसा, अचलपूर, दर्यापूर आणि मोर्शी मतदार संघात 60 टाक्यांच्या वर मतदान झाले.