अमरावती - शहरातील रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी नागपूरसाठी सुटणाऱ्या पॅसेंजर गाडीने आता कात टाकली असून या गाडीला नवा लूक मिळाला आहे. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन सारखा लूक प्राप्त झालेल्या या पॅसेंजरमध्ये प्रवाशांना आता सुखकर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. तर अमरावती ते नागपूर प्रवास जवळपास अर्ध्या ते पाऊण तासांनी कमी होणार आहे.
हेही वाचा - करजगाव फाट्यावर ट्रॅक्टरची कारला धडक, एकाचा मृत्यू
अमरावती ते नागपूर पॅसेंजरला पूर्वीसारखे मोठे इंजिन नाही. या गाडीचा लूक मुंबईत धावणाऱ्या लोकल सारखा आहे. अमरावतीवरून दररोज 3 वाजून 10 मिनिटांनी सुटणारी ही गाडी आधी बडनेरा स्थानकावर जायची आणि बडनेरा येथून 4 वाजता निघून ही गाडी नागपूरला रात्री 9.15 वाजता पोहोचायची. नव्या स्वरूपाची अमरावती-नागपुर पॅसेंजर ही आता बडनेराला न जाता थेट टीमतालाकडे वळून नागपूरकडे जाणार आहे. त्यामुळे या गाडीद्वारे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
एकूण 12 बोगी असलेल्या या नव्या गाडीला पूर्वी साधे कोच होते. आता या कोचची रचनाही सिटींग कोच अशी करण्यात आली आहे. तसेच या गाडीला पुढे आणि मागे प्रत्येकी 1 व 2 मदत इलेक्ट्रिकल युनिट जोडण्यात आली आहेत. या गाडीच्या सर्व बाराही डब्यांना लोकलप्रमाणे गाडीच्या मध्ये दार देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना पुढे येणाऱ्या रेल्वे स्थानकाची माहिती देण्याकरिता प्रत्येक पोस्टमध्ये डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावण्यात आला आहे.
हेही वाचा - अमरावतीत 40 हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
प्रवाशांना थेट चालकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्थाही या गाडीमध्ये आहे. प्रत्येक कोचमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गाडीमध्ये चुकीच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सध्या ही गाडी ट्रायल म्हणून धावत असून येत्या काही दिवसात या गाडीचे नव्याने वेळापत्रक तयार केले जाणार असून छोटेखानी सोहळ्यात या गाडीचे लोकार्पण केले जाणार आहे. या गाडीमुळे आता अमरावती आणि नागपूरकडून येणाऱ्या प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा आनंद मिळणार आहे.