अमरावती - कोरोना काळात निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर चाप बसवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यात मोहीम राबवली. राजकमल चौकात या धडक मोहिमेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहभागी होत कारवाईला चालना दिली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध अधिकारी मोहिमेत सहभागी होते. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्यात आली.
विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी -
कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँन्टीजेन चाचणी करण्याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. अमरावती शहरात उपक्रमाची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्यात आली. उपायुक्त रवि पवार यांनी रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने विनाकारण फिरणा-यांची अँन्टीजेन चाचणी केली.
208 नागरिकांची केली चाचणी -
राजकमल चौक आणि राजापेठ चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची अँन्टीजेन चाचणी करण्यात आली. २०८ नागरिकांची अँन्टीजेन चाचणी करण्यात आली आहे. इतवारा बाजार येथे रॅपिड अँन्टीजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले होते. त्याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. जिल्ह्यात ठिकठिकाणी ही मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. चांदुर रेल्वेच्या जुन्या एस. टी. स्थानकावरही ४० जणांना तपासण्यात आले. पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना तत्काळ कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे.
राजकमल चौकातील तीन दुकाने सील -
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तु वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असतांना राजकमल चौक येथे खुले असलेल्या दुग्धपुर्णा शितालय दुकान, विमल डिजिटल लॅब, श्री बालाजी दुकानावर मनपाच्या पथकाने कारवाई करुन दंड ठोठावला. दरम्यान सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, निरीक्षक आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, मनोज इटनकर, शुभम चोमडे, सागर अठोर, राहुल वैद्य, मनपा कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.