अमरावती - मोझरी विकास आराखडा अंतर्गत गुरुदेव नगर व मोझरीसाठी तबल २६ लाख रुपये खर्चून काही वर्षपूर्वी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. परंतु या स्मशानभूमीला पक्का रस्ताच नसल्याने पावसाळ्यात या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण कठीण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या स्मशानभूमीच्या जागेची पाहणी करून पक्का रस्त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला पाहणी दरम्यान दिले आहेत.
मृतदेह स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेणे म्हणजे तारेवरची कसरत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मोझरी विकास आराखड्यांतर्गत गुरुदेव नगर व मोझरीसाठी एक स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. परंतु बांधकाम करते वेळी रस्त्याचे कुठलेच नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नव्हते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणे म्हणजे जणू तारेवरची कसरत झाली आहे. अनेक लोकांना आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराची जागा देखील वेळेवर बदलविण्याची वेळ या रस्त्यामुळे आली आहे. त्यामुळे आता हा रस्ता पक्का व्हावा यासाठी पालकमंत्री मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत या जागेची पाहणी केली रस्त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करुन लवकरात लवकर पक्का रस्ता करावा, असे निर्देश पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थीत होते.
पावसाळ्यापूर्वी रस्ता तयार करण्याचे प्रयत्न करू
आज पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी स्मशानभूमीच्या जागेची पाहणी केली. सध्या जागेचे दोन पर्याय उपलब्ध आहे. जो पर्याय लोकांच्या सोईचा होईल, तो पर्याय निवडून रस्ता तयार करण्यात येईल. पावसाळा पूर्वी पक्का रस्ता तयार करण्याचे आम्ही प्रयत्न करू, असे तिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी सांगितलं.