अमरावती - कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आता म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) आजार या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे उपचारयंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा व इतर विभाग, वैद्यकीय क्षेत्र, विविध संस्था, संघटना सर्वांनी मिळून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
'काळजी घेतल्याने जोखीम कमी'
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले की, कोरोनानंतर रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रासह विविध यंत्रणा, संस्था, संघटनांनी समन्वयाने प्रभावी जनजागृती करावी. प्राथमिक स्तरावर उपचार व काळजी घेतल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे याबाबत कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ईएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'टूथब्रश बदला, दोनदा ब्रश करा'
कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर होता कामा नये. कोरोनानंतर रूग्णांनी वैयक्तिक स्वच्छता जपणे खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी मास्क बदलणे, टुथब्रश बदलणे, दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. कोरोनानंतर रुग्णांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून नियमित संपर्क ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यानी यावेळी दिले आहे.
'निदान आणि तपासणी'
रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टेरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्यूकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे. प्रत्येक कोरोनोबाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. कोरोना रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्यूकरमायकोसिसचा धोका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.