अमरावती - राज्यात अनेक ठिकाणी कोविड रुग्णालयात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अमरावती शहरातील कोविड रुग्णालयातही महिला आणि पुरुष रुग्णांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येत आहे. याला भाजपा महिला आघाडीने आक्षेप घेतला आहे. कोविड रुग्णालयात महिला रुग्णांसाठी त्वरित स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चा सचिव सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना याबाबत एक निवेदन सादर करण्यात आले. कोविड रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, महिला कक्षासाठी महिला सुरक्षा रक्षक नेमावे, महिला दाखल असणाऱ्या बेडलागत बेलची व्यवस्था असावी. महिला कर्मचारी असणाऱ्या कक्षाला रात्री कुलूप लावण्यात यावे अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
रुग्णालतात अतिरिक्त बेडची व्यवस्था केली जाणार असून महिलांच्या स्वतंत्र कक्षाबाबतही व्यवस्था केली जाईल असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, अमरावती शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष लता देशमुख, संध्या टिकले, सुचिता बीरे, राधा कुरील, सुषमा कोठीकर, निकिता पवार, मीना पाठक आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.