अमरावती - कोरोनामुळे मागील पाच महिन्यांपासून शासकीय शाळा, महाविद्यालये अजूनही बंद आहे. पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षांच्या परिक्षेचा निर्णय अजून व्हायचा आहे. अशातच काही शिक्षकांनी खासगी शिकवणी सुरू केल्या आहेत. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अशा शिक्षकांना फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, ऑनलाईन प्रणाली वगळता, विद्यार्थ्यांना एकत्र बसवून खासगी शिकवणी होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे. यामध्ये कुठेही सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे अशी शिकवणी कुठे होताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, केंद्र सरकारने राज्यातील शाळा या २१ सप्टेंबरपासून सुरू करता येतील का, याविषयी सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक घेतली. त्यात त्यांनी राज्यातील संस्थाचालकांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मागील महिन्यात शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयातही तातडीने बदल केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - नांदगाव खंडेश्वर पाण्यात आढळला जिवंत नारू सदृश्य जंतू ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
हेही वाचा - सर्पदंश झालेल्या आईला भेटण्यास आलेल्या मुलाचा अन त्याच्या मित्राचा नदीत बुडून मृत्यू