अमरावती - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना फवारणीचे सत्र सुरू केले आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण माजले, शिवाय किडींनीही जोर धरला आहे. पाऊस ओसरताच त्याच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशक फवारणीला वेग आला आहे. तथापि, नेमके कोणते आणि किती प्रमाणात कीटकनाशक फवारावे, याबाबत ग्रामस्तरावर मार्गदर्शनाची वानवा आहे. दरम्यान सध्या कपाशी व सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके संकटात आले आहे.
खरिपातील मूग व उडीद ही पिके परिपक्व झाले आहे. काही ठिकाणी शेंगांना कोंब आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीळ व सोयाबीन पिके सध्या फुलांनी बहर धरला असून, काही ठिकाणी शेंगासुद्धा लागल्या आहेत. आता फक्त शेंगा भरण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. परंतु, तोपर्यंत आपली पिके कीटकमुक्त ठेवण्यासाठी सोयाबीनवर तीन ते चार कीटकनाशक फवारणी करून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार सध्या तालुक्यातून पावसाने विश्रांती घेतली असून, आता शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीला वेग दिला आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी शेतात नेमके कुठले व कोणत्या कंपनीचे औषध फवारावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.मात्र सध्या तरी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन कृषी विभागाकडून शेतकऱयांना देण्यात आलेले नाही.
धुक्याने वाढविली चिंता -
जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये एक-दोन दिवसांपासून सकाळी दाट धुके दाटते. ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणवते. यामुळे फुले गळतात व शेंगा पूर्णपणे भरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव -
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याची भीती सद्या आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभरातील सोयाबीन पिकांवर खोडकिडी ने अटॅक केला होता. यंदा मात्र खोड कीड याचा प्रादुर्भाव असल्याची भीती ही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. जर यावर्षी खोडकीड ने मोठ्या प्रमाणात अटॅक केला तर यंदा ही सोयाबीन उत्पादन शेतकरी चिंतेत पडण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी केवळ 5 क्विंटल कापसाचे उत्पादन -
मागील वर्षी जार रुपये खर्च करून कपाशीचे पीक तयार केले .परंतु कपाशीवर बोंड अळीचे सावट आल्याने कपाशीचे पीक हातातून गेले. केवळ पाच क्विंटल कापूस झाल्याने लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज अंगावर थकले आहे. दरम्यान यंदा तरी चांगले उत्पन्न होईल या आशेने सध्या आम्ही फवारणी करत आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी अरविंद काळे यांनी दिली.