अकोला - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून लाचेचे उर्वरित १२ हजार रुपये घेत असताना दहीहंडा पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २३) अटक केली आहे. दिनेश जगदेव सोळंके असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दुसरा आरोपी असलेल्या पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई मंगेश खेडकर यास एसीबीने अद्याप अटक केली नाही.
आरोपींनी तक्रारदारास अवैध वाळू वाहतूक केली म्हणून गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्याची भीती दाखवली. तसेच तक्रारदारास व त्याच्या सहकाऱ्यांना सुमारे चार ते पाच तास थांबवून ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील ११ हजार रुपये तक्रारदाराकडून घेतले. उर्वरीत १२ हजार रुपये रकमेची मागणी करीत असल्याने तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २५ मार्च रोजी तक्रार केली.
यातील पोलीस नाईक दिनेश सोळंके यास अटक केली असून दुसरा पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई मंगेश खेडकर यास अटक झाली नाही. दरम्यान, तक्रारदाराने २५ मार्च रोजी तक्रार दिली होती. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांनी केली आहे.
एक आरोपी पोलीस निवडणूकीच्या कर्तव्यावर
अकोला एसीबीने दोन पोलीस कर्मचाऱयांवर १२ हजार रुपये लाच घेतल्याची कारवाई केली आहे. यातील मंगेश खेडकर हा कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याचे समजते.