अमरावती - मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपचाच गेम असल्याचा खळबळजनक आरोप आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक काळात पैशांची डीलिंग केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक, कार्यकर्ते निवडणुकीच्या दिवशी गायब होते, असेही अभिजित अडसूळ यांचे म्हणणे आहे.
आज अभिजित अडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. आनंदराव अडसूळ पाचवेळा विदर्भातून निवडून आले आहेत.अशात यावेळी झालेला त्यांचा पराभव फार मोठा धक्का आहे. निवडणूक काळात भाजप जिल्हाध्यक्षांच्या दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. एका क्लिपमध्ये चक्क ५ कोटी रुपयांची डीलिंग करत होते तर दुसऱ्या ऑडिओ क्लीपमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवसैनिकाला धमकावीत होते.
भाजपच्या काही लोकांनी आनंदराव अडसुळांसाठी कामच केले नाही. अमरावती शहरात भाजपचे आमदार आणि ४४ नगरसेवक असताना अडसूळांना २७ ते २८ हजार मतांचा फटका बसला आहे. यातून शिवसेनेला भाजपकडून जाणूनबुजून धक्का दिला गेला असल्याचे म्हटले जात आहे. हे सर्व वरच्यांचे आदेश होते, की काय असा सवालही अभिजित अडसूळ यांनी उपस्थित केला आहे. अमरावती शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही आनंदरावांसाठी काम केले नाही, असे अभिजित अडसूळ यांनी म्हटले आहे.