अमरावती - विविध मागण्यांसाठी 6 ऑक्टोबरपासून उपोषणावर बसलेल्या 11 पैकी 4 आशा स्वयंसेविकांची प्रकृती ढासळली आहे. यातील तिघींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णांलयात हलविण्यात आले आहे. मात्र, एकीने मागण्या मान्य होईस्तोवर उपचार घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नंदा मेश्राम, अफशा ताबसुम, अजना ढोके आणि वंदना मोहोड, अशी प्रकृती खालावली असलेल्या आशा स्वयंसेविकांची नावे आहेत. यापैकी वंदना मोहोड यांनी आमच्या मागण्या मान्य होतील तेव्हाच उपचार घेईल, अशी टोकाची भूमिका घेतली आहे.
कोरोना महामारी काळात आशा स्वयंसेविकांना 300 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, अंगणवाडी सेविकेप्रमाणे आशा वर्करला 7500-9000 रूपये मानधन मिळावे. 2019पासून राज्यशासन राबवित असलेल्या आयुषमान आणि इंद्रधनुष्य योजनेचे मानधन मिळावे तसेच आशा स्वयंसेविकांना शासकिय सुविधांचा लाभ मिळावा, या मागण्या या आशा स्वयंसेविकांनी केल्या आहेत.
आपल्या मागण्यांसाठी मागील पाच दिवसंपासून आंदोलन करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गुरुवारी ठिय्या दिला होता. जिल्ह्याच्या खासदार महिला आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री या महिला आहेत. तसेच अमरावतीच्या आमदारही महिला आहेत. मात्र, गरीब असणाऱ्या आशा स्वयंसेविका महिलांचे दुःख या लोकप्रतिनिधींना कळत नाही. मागील पाच दिवसांपासून कुणीही आमच्या आंदोलनाची दाखल घेतली नाही, असा आरोप या आशा स्वयंसेविकांनी केला आहे.