अमरावती - विविध खेळांत रंगून, उखाणे घेत गमती जमतीत पैठणीसह अनेक बक्षिसे जिंकण्यासाठी अमरावतीकर महिलांसाठी भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांनी आनंदमयी खेळाचे आयोजन केले होते. या माध्यमातून अमरावती मतदारसंघात असाच आनंद टिकून राहावा यासाठी धनुष्यबाणाला निवडून देण्याचे आवाहन बांदेकर यांनी यावेळी केले.
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारानिमित्त शिवसेनेचे उपनेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या 'खेळ मांडीयेला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा मैदान येथे आयोजित या आगळ्या-वेगळ्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या. आदेश बांदेकरांचा महिलांसोबत साधला जाणारा थेट संवाद, महिलांकडून उखाण्यांसह छोट्या मोठ्या कौटुंबिक चर्चेत रंगून जाणे आणि भाऊजींनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या वहिनींच्या प्रश्नांने या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.
युवतींपासून वृद्ध महिलांनी यावेळी आयोजित विविध खेळांमध्ये दाखविलेला उत्साह वातावरण आनंदमय करणारा होता. आदेश बांदेकर यांच्या प्रत्येक वाक्यात आनंद हा शब्द येत असताना आनंदराव अडसूळ यांना पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी, असे आवाहन बांदेकरांकडून केले गेले. या रंगतदार कार्यक्रमाला भाजप, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहरातील महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटेंसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.