अमरावती - चांदुर बाजार शहरात रस्ते रुंदीकरणाचे काम झपाट्याने सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे झाडे काढली जात आहेत. शहरातील गो. सी. टोम्पे महाविद्यालय चौकात रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये एक कडुनिंबाचे झाड आहे. या झाडावर दुर्मिळ होत चालल्या पांढऱ्या मानेच्या करकोचाने घरटे बांधून अंडी दिली आहेत. या करकोच्याची पिले सुखरूप जन्माला यावीत यासाठी पक्षीप्रेमी आणि वृक्षप्रेमी एकत्र आले. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या करकोचाचे घर असलेले कडुनिंबाचे झाड न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्यावरील उंच लिंबाच्या झाडावर दुर्मिळ होत चाललेल्या पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork) या पक्षाचे घरटे असल्याचे पक्षी मित्रांच्या लक्षात आले. हे झाड तोडले तर त्या पक्षाचे घरटे विस्कळीत होईल आणि पक्षाची अंडीही नष्ट होतील, ही बाब पक्षीमित्र आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या शिवा काळे यांच्या लक्षात आली. काळे यांनी झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराला विचारपूस केली असता त्याने झाडे तोडण्याची परवानगी असल्याचे सांगितले.
शिवा काळे यांनी चांदूरबाजारचे तहसीलदार जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तहसीलदारांनी क्षणाचाही विलंब न करता योग्य मार्गे त्या पक्षाच्या घरट्याला वाचवण्यासाठी संबंधित विभागाला संपर्क केला. वनविभागाचे अधिकारी लोखंडे आणि कर्मचाऱयांनी त्या ठिकाणावर पाठवून स्थळ परीक्षण अहवाल मागवला. दरम्यान, पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रफुल्ल रुईकर, अनुप रघुवंशी, श्रेयश चडोकार, नितीन मांडवकर, गौरव केचे यांच्यासह अनेक लोक त्या ठिकाणी पोहचले.
स्थळ परीक्षण करण्यासाठी झाडावर चढून घरट्याचे फोटो घेण्याचे आणि त्यात अंडी आहेत की पिले हे बघण्याचे आव्हान वनविभागासमोर होते. मात्र, पक्षीमित्रांच्या विनंतीला मान देऊन राहूल ढवळे यांनी त्यांचा ड्रोन कॅमेरा वापरून सदर घरट्याचा व्हिडिओ व फोटो काढून वन अधिकारी लोखंडे यांना त्वरित सादर केला. या व्हिडिओ व फोटोवरून त्या घरट्यात तीन अंडी व एक नवजात पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भेंडे यांनी चांदुर बाजार येथील अभियंता बोबडे यांना पक्षाच्या घरट्याला वाचवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन रस्त्यातचे काम करण्याचे निर्देश दिले.
वन अधिकारी व बांधकाम अधिकारी यांच्या चर्चेनंतर बांधकाम विभागाने त्या पक्ष्याच्या पिल्यांचे पालकत्व स्विकारले. जो पर्यंत या पक्षाची पिले मोठी होऊन उडून जात नाहीत, तो पर्यंत ते झाड न कापता बाकीचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.