अमरावती - कोरोनाच्या भीतीपोटी अनेकजण चाचणी करत नसल्याचे दिसत आहे. मात्र, याला अपवाद ठरल्या त्या जिल्ह्यातील भूगाव येथील रहिवासी मनकर्णा कडू. या आजी ९५ वर्षांच्या आहेत. जिल्हा रुग्णालयात ८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
हेही वाचा - मांजरखेड येथून अनधिकृत कपाशी बियाणे जप्त; दोन आरोपींना अटक
मनकर्णा यांना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार होत असताना डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. कोरोना चाचणी केल्यानंतर मनकर्णा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या मुलाने १५ मे रोजी त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ८ दिवस उपचार घेतल्यानंतर मनकर्णा आजीचा अहवाल निगेटिव्ह आला. आजीबाई घरी परतल्या.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी योग्य काळजी घेतल्याने ९५ वर्षीय मनकर्णा कडू यांनी कोरोनावर मात केली. सद्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी कोरोना आजार बरा होतो, त्याला वयाची मर्यादा नाही, हे ९५ वर्षांच्या आजीने दाखवून दिले आहे. कडू कुटुंबीयांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहे.
हेही वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपीला अटक