अमरावती - एकीकडे देशभरात लॉकडाऊन सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील मल्हारा या गावातील आकाश गुप्ता याने त्याच्या घरी गुटखा साठवून करून ठेवला होता. याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच त्याच्या घरी छापा टाकून तब्बल 46 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी आकाश गुप्ताला पोलिसांनी अटक केली असून एकाच आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. तरीसुद्धा अनेक गुटखा माफियांनी त्यांच्या घरामध्ये लाखो रुपयांचा गुटखा भरून ठेवला आहे. दरम्यान, अशाच प्रकारे अचलपूर तालुक्यातील मल्हारा या गावातील आकाश गुप्ताकडे गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकून तब्बल 46 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याच आठवड्यात तीन दिवसांपूर्वी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सुरज तेजवाणी या गुटखा माफियांकडून परतवाडा पोलिसांनी 43 हजारांचा गुटखा जप्त केला होता.