अमरावती- जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी दरम्यान एका मालवाहू ट्रकमधून 3 क्विंटल पेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. कारवाईत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हैदराबादच्या निजामाबाद येथून अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रक गांजा घेऊन जात असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान ट्रक पुढे जात असल्याने नागपुरी गेट पोलिसांनी याची माहिती वलगाव पोलिसांना देताच सापळा रचत पोलिसांनी ट्रक पकडून 3 क्विंटल गांजा जप्त करत कारवाई केली. यात जवळपास 33 लाखांचा गांजा व 12 लाख रुपये किंमतीचा ट्रक, असा एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहम्मद सिद्दिकी मोहम्मद फारूक (वय 25), सलीम मुल्ला मुजफ्फर मुल्ला (वय 35), शेख शोएब शेख हसन (वय 25), अनुज नवजीरे (रा.सर्व अमरावती) या 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
ट्रकमधील गांजा हा परतवाडा येथे जात असल्याची माहिती आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात येवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी कशी होत होती, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर कारवाई वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चोरमले यांनी केली आहे.