अमरावती- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला. यात अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कबीर संजय माखीजा हा 97.38 टक्के गुणांसह पहिला आला, तर याच महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची श्रद्धा राजेश चांडक हिने 97.08 टक्के गुण मिळवून दुसरे स्थान पटकाविले.
कबीर माखीजा याला 650 पैकी 633 गुण मिळाले असून श्रद्धा हिने 659 पैकी 631 गुण मिळवले आहेत. कबीर हा वर्धा जिल्ह्यातील आर्वीचा रहिवासी असून अमरावतीत तो शिकायला होता. येथील राजपेठ परिसरात मित्रांसोबत तो राहायचा आणि अभ्यास करायचा. भविष्यात त्याला सीए करायचे असल्याचे तो ईटीव्ही भारताशी बोलताना म्हणाला, तर श्रद्धा हिने सी ए केल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी करायची असल्याचे सांगितले. बारावीत टॉप करण्याची जिद्द ठेऊन दिवसाला सात ते आठ तास अभ्यास करायची, असे श्रद्धाने 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना सांगितले.
या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत एकूण 56 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या वर गुण प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भंगडीया यांनी कबीर आणि श्रद्धाचा सत्कार केला. महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी यावेळी जल्लोष व्यक्त केला.