अमरावती : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील १०६ वर्षाच्या गयाबाई चवणे या आजीबाईंनीही अगदी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला आहे.
वार्धक्याने या आजी थकल्या असल्या, तरी त्यांच्या मध्ये असलेला मतदानाचा उत्साह मात्र तरुणांप्रमाणे कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत त्या नेहमी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या प्रक्रियेत त्या सहभाग नोंदवतात. गावाचा विकास फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतो, त्यामुळे सर्वांनी मतदान करावे असे आवाहन देखील गया आजीने केले आहे.
दरवर्षी करतात उत्साहाने मतदान..
अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात गयाबाई किसनराव चवणे या १०६ वर्षीय आजीबाई राहतात. प्रत्येक निवडणुकीत त्या आपला मतदानाचा हक्क बजावतात. निवडणूक आली, की मतदानाच्या दिवशी त्या स्वयंपूर्तीने तयार होऊन आपल्या कुटुंबासोबत त्या मतदान करायला जातात. सहा लोकांचे कुटुंब असलेल्या चवणे कुटुंबातील गयाबाई या प्रमुख असल्याचा त्यांचे कुटुंबीय सांगतात. आज जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतच्या निवडणूक होत आहे. यात अनेक जण निवडणुकीत मतदान करण्याचा नकार देतात परंतु गयाबाई या आजही उत्साहाने मतदान करतात.
मोझरीतील निवडणूक महत्त्वाची..
गयाबाई यांनी ज्या गावात मतदान केले ते मोझरी गाव राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचेही गाव आहे. त्यामुळे या गावातील निवडणूक राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मागील दहापेक्षा जास्त वर्षांपासून या गावात यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम आहे. या निवडणुकीत मतदार हे यशोमती ठाकूर यांच्या गटाला पसंती देतील, की दुसरा पर्याय निवडतील हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
अमरावती ग्रामपंचायत निवडणूक..
आज होणाऱ्या निवडणुकीत १० लाख ४० हजार १५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदा निवडणुकीत सर्वच मोठ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे मतदारांचा नेमका कौल कोणाला मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. ५५३ पैकी १३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतीत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही. उर्वरित ५३७ ग्रामपंचायतीच्या ४ हजार ३९७ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी १ हजार ९४८ मतदान केंद्रे असून, ५ लाख ६ हजार ८०४ महिला, ५ लाख ३३ हजार ३४४ पुरुष तसेच इतर ९ असे एकूण १० लाख ४० हजार १५९ मतदार आहेत. अमरावती तालुक्यात ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी १८० मतदान केंद्रे असून, ४५ हजार ५५८ महिला, ४७ हजार ९८९ पुरुष व तीन इतर असे ९३ हजार ५७७ मतदार आहेत. आता मतदानाला सुरुवात झाली असून सध्या मतदान केंद्रावर फारशी गर्दी नाही.