अमरावती - भरधाव वेगात येणाऱ्या कारला अपघात झाल्याची घटना वलगाव मार्गावर रिंग रोडलगत घडली. यामध्ये एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून, ५ डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. सुधीर अडगोकार असे अपघातात ठार झालेल्या डॉक्टरचे नाव असून, ते पथ्रोड येथील रहिवासी आहेत.
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात महत्त्वाच्या कामानिमित्त डॉक्टर सुधीर अडगोकर हे पाथरूड येथील सहकारी डॉ. प्रभाकर तारे, डॉ. विष्णूनाथ कविटकर, डॉ. संजय तिखीले, डॉ. विलास कविटकर आणि डॉक्टर घनश्याम यांच्यासोबत कारने गुरुवारी दुपारी अमरावतीला येत होते. यावेळी वलगाव ओलांडल्यावर अमरावती शहराजवळ आले असतानाच रिंग रोडवर भरधाव वेगात असणारी कार अचानक पलटली. या भीषण अपघातात डॉ. सुधीर अडगोकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ५ डॉक्टर गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सर्व डॉक्टरांना अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.