अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाला आज सकाळी जिल्ह्यातील 1 हजार 19 मतदान केंद्रावर सुरुवात झाली. आतापर्यंत मतदान शांततेत झाले असून सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत आहे. साडेआठ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पळसो बढे या त्यांच्या गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यासोबतच आमदार रणधीर सावरकर यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष वेगवेगळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीने बाहेरील उमेदवार दिल्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने यावेळी जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडी आपला झेंडा कायम राहील का? याबाबत शंका निर्माण होत आहे.
दरम्यान, सर्वच तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहावयास मिळत आहे. तसेच प्रशासनाकडूनही मतदारांना मतदान करताना कुठलाही त्रास होऊ नये. याबाबत काळजी घेण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन तासात 7.6 टक्के मतदान झाले आहे. 61 हजार 53 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
हेही वाचा - अकोल्यात जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान, निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज