अकोला - गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने उत्पन्न नाही. अशात वित्तीय संस्थाकडून सतत पैशांच्या मागणीमुळे नागरिक चिंतीत झाले आहेत. त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी वित्तीय संस्थांकडून होणारी सततची पैशांची मागणी थांबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि प्रबुद्ध भारत संस्थेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
अकोल्यातील कोरोनाबाधितांचे आकडे दररोज वाढतच आहेत. त्यातच केंद्र सरकारने आणि त्यानंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांवर बिकट आर्थिक स्थितीमध्ये जगण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे, अनेकजण आर्थिक टंचाईचा सामना करीत जगत आहेत. मात्र, काही खासगी वित्तीय संस्था तर काही बँका या नागरिकांना सतत पैशांची मागणी करीत आहेत. आधीच आर्थिक संकटात असताना या वित्तीय संस्था नागरिकांना त्रास देत आहेत.
अकोला जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत संस्था तारफैल अकोलाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले गेले. यावेळी चंद्रशेखर नकाशे, सोनू वासनिक, सिद्ध डोंगरे, सिद्धार्थ खोब्रागडे, राजू रामटेके आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.