अकोला - जिल्ह्यात आज सायंकाळी बऱ्याच ठिकाणी जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासोबत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात काढणीसाठी आलेला हरभरा व गहू पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पावसानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसायला लागला होता.
वेधशाळेने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. वेधशाळेचा अंदाजानुसार आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी मात्र जोरदार वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनाही धावपळ करावी लागली. तर पाऊस पडत असल्याने रस्तेही रिकामे झाले होते.
हेही वाचा - कोल्हापुरातील गडहिंग्लज, आजरा भागात पावसाची हजेरी
या पावसामुळे शेतात आठ ते दहा दिवसानंतर काढणीसाठी येणारा गहू व हरभरा ओला झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही पीके खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसत होता. मनमोहक इंद्रधनुष्य पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा - सांगलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; द्राक्ष बागांना फटका