अकोला - एकूण अपघातांच्या घटनांमध्ये 60 टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. या अपघातात मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच गंभीर जखमी किंवा कायमस्वरुपी अपंगत्व येण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेल्मेट सक्तीने वापरावे, असे आदेश शासने दिलेले आहेत. मात्र, दुचाकीचालक या आदेशाकडे डोळेझाक करतात. त्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू ओढावला जाऊ शकतो.
हेल्मेट वापरल्यास वाहनचालकाचा 90 टक्के जीव वाचण्याची शक्यता असते. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यात अपघतात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीच्या अपघातांची संख्या जास्त आहे. जर वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर केला असता तर ही संख्या कमी झाली असती. त्यामुळे हेल्मेट वापरणे हे गरजेचे असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
सामान्य माणूस हेल्मेट खरेदी करताना स्वस्तातील हेल्मेटला प्राधाण्य देतो. मात्र, कमी किमतीत मिळणाऱ्या हेल्मेटचा दर्जा निकृष्ठ असू शकतो. त्यामुळे हेल्मेट खरेदी करताना आयएसआय मार्क, दर्जा तपासूण घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही अधिक जास्त प्रमाणात सुरक्षित राहू शकता, असे हेल्मेट विक्रेते हेमंत गुप्ता यांनी सांगितले.
हेल्मेट नसेल तर शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून कारवाई किंवा दंड वसूल करण्यात येतो. वाहन चालक कारवाईला सामोरे जातात. मात्र हेल्मेट खरेदी करत नाहीत, असे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.
छोट्या शहरात नियमाचे उल्लंघन...
हेल्मेटच्या नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसते. मोठ्या शहरांमध्ये हेल्मेट सक्ती असली तरी मात्र लहान शहरांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते.