अकोला - श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी येथे कावड महोत्सवानिमित्त मोठा उत्सव भरतो. हा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी त्यादिवशी दारूबंदी करण्यात येते. अवैध दारूविक्रेते त्याआधीच दारूची साठवणूक करतात. अशाच प्रयत्नात असलेल्या दोघांना उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने आज दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 168 देशी दारूच्या बाटल्या आणि दोन दुचाकी असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येथील कावड महोत्सवानिमित्त शहरात शेकडो कावड पालखी गांधीग्राम येथून पाणी घेऊन येतात. या रस्त्यावर बघणाऱ्यांची संख्या मोठी असते. दरम्यान, यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून आधीच खबरदारी घेण्यात येते. म्हणून पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतात. त्यातून उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विशेष पथकाने सुभाष चौक आणि खडकी या दोन ठिकाणी अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना एकूण 168 देशी दारू बाटल्या व दोन दुचाकी मोबाईल असा एकूण 85 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
योगेश जविरे, योगेश सिंगमवार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. विशेष पथकाच्या या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित डहारे, विनय जाधव, राज चंदेल, रवि घिवे, नदीम शेख यांचा सहभाग होता.