अकोला - तालुक्यातील अमानतपुर ताकोडा येथील दुकानांत शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिस अधीक तपास करत आहेत. अनेकांची चौकशी केल्यानंतरही धागेदोरे जुळत नसल्याने ही चौकशी अजून सुरू राहणार आहे. किराणा दुकानांवर नकली नोटा चालवणाऱ्या या दोघांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
शंभरच्या नकली नोट देऊन उदय आणि अचल किराणा या दुकानांमधून 90 रुपयांची आरोपींनी खरेदी केली होती. हा प्रकार दुुकाणदार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना या बाबत कळवले. नकली नोटा देऊन सिगारेटचे पाकीट खरेदी करत पळ काढलेल्या राहुल तायडे आणि जगदीश सपकाळ या दोघांचा ग्रामस्थांनी खडकी टाकळी गावाच्या रस्त्यावर शोध घेतला. या दोघांना तेथून पकडून आणून ग्रामस्थांनी अमानतपूर ताकोडा या गावातील दुकानात आणले. तेथे त्यांची चौकशी केली. ग्रामस्थांनी नकली नोट का दिली, अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्या खिशात शंभर रुपयांच्या 22 बनावट नोटा आढळून आल्या होत्या. ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास टाळले होते.
ग्रामस्थांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत युवकांना ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या संपर्कात असलेल्या इतरांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली. परंतु, त्यात कुठलाही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या अद्याप वाढलेली नाही. या प्रकरणामुळे नकली चलन बाळगणारी टोळी पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.