अकोला - अवैधरित्या रॉकेल, डिझेलची विक्री करणाऱ्या तिघांना पातूर पोलिसांनी अटक केली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम बोडखा येथील किसान धाबा येथे एका टँकरमधून काढण्यात येणारे डिझेल व रॉकेल विशेष पथकाने शुक्रवारी जप्त केले. पोलिसांनी 23 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तिघांना अटक केली असून एकजण फरार झाला आहे.
हिदायत खाँ रूम खाँ उर्फ इददु पहेलवाण व त्याचा भाऊ मम्मु आणि त्यांचे सोबती तसेच गायगांव येथून इंडियन पेट्रोलियम कंपनीच्या टँकरचे चालक-क्लिनर यांच्या संगनमताने डिझेल, रॉकेल काढून अवैधरित्या विक्री करतात,अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बाहकर यांच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली.
काही लोक इंडियन ऑईल कंपनीच्या टँकर मधून पाईपने कॅनमधे डिझेल काढतांना दिसून आले. पोलिसांची चाहुल लागल्याने काहीजण पळूण गेले. शेख नसीम शेख करीम, अमजत खाँ सरदार खाँ पठाण, अमजत खाँ जफरउल्ला खाँ हे त्यात सापडले. तर, साकिब हा पळुन गेला. आरोपींकडून टॅकर क्रमांक एमएच - ३८ - डी ४४५५ किंमत १५ लाख रूपये, ज्यामध्ये चारही कप्प्यात १२ केएल डिझेल किंमत ८ लाख १६ हजार रूपये, अशी एकूण किंमत २३ लाख १६ हजार रुपये व एक सॅमसंग नोट ८ कंपनीचा 65 हजारांचा मोबाईल असा एकुण २३ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.