अकोला - शहरात आज दुपारच्या सुमारास भर उन्हात पावसाने हजेरी लावली. तुरळक पडलेल्या पावसांच्या सरीने थोडावेळ हवेत गारवा निर्माण झाला होता. यावेळी अकोलेकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला आहे.
शहरात सकाळपासूनच आकाशात काही प्रमाणात ढग दिसून येत होते. मात्र वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता आणि दुपारून तो खराही ठरला.
शहरातील काही भागात पाऊस पडला आहे. तर काही भाग हा कोरडा राहीला आहे. पावसाची रिपरिप ही उन्हात तब्बल 15 ते 20 मिनिट सुरू होती. या पावसाने वातावरणात थोडाफार थंडावा जरी निर्माण केला असला तरी जमिनीतील उष्णता यामुळे बाहेर निघाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला आहे.